[Unicode]  युनिकोड म्हणजे काय? Home | Site Map | Search
 

युनिकोड म्हणजे काय?

कोणतीही आधारप्रणाली असो
कोणतीही संगणकप्रणाली असो
कोणतीही भाषा असो
प्रत्येक अक्षरखुणेला युनिकोडात एक अनन्य क्रमांक दिलेला असतो.

मुळात संगणक केवळ क्रमांक वापरतात. अक्षरे आणि इतर खुणा ह्यांना प्रत्येकी एक एक क्रमांक देऊनच संगणकांत साठवतात. युनिकोड अस्तित्वात येण्यापूर्वी खुणांना क्रमांक देणाऱ्या शेकडो संकेत-प्रणाल्या उपलब्ध होत्या. कोणत्याही एका संकेत-प्रणालीत पुरेशा अक्षरखुणा नसत. उदा. एकट्या युरोपीय संघालाच आपल्या सर्व भाषा संकेतवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या खुणांची आवश्यकता असे. इंग्रजीसारख्या एकाच भाषेतही सर्वसामान्य वापरातील सर्व अक्षरे, विरामचिन्हे आणि तांत्रिक खुणा लिहिता येण्यासाठी कोणतीही एकच संकेतप्रणाली पुरत नव्हती.

या संकेतप्रणाल्या परस्परविरोधीही होत्या. दोन वेगळ्या संकेतांत एकाच क्रमांकाशी दोन वेगळ्या खुणा निगडित असणे किंवा एकाच खुणेशी दोन वेगळे क्रमांक निगडित असणे हे शक्य होते. कोणत्याही संगणकावर (विशेषतः सर्व्हर प्रकारातील) विविध संकेत वापरण्याची सोय असणे आवश्यक असते. तरी सुद्धा एका संकेतातून दुसऱ्या संकेतात माहितीचे रूपान्तर करताना माहिती भ्रष्ट होण्याचा धोका असतोच.

युनिकोडामुळे हे सर्व बदलत आहे!

कोणतीही आधारप्रणाली असो, कोणतीही आज्ञावली असो, कोणतीही भाषा असो, प्रत्येक अक्षरखुणेला युनिकोडात एक अनन्य क्रमांक दिलेला असतो. अॅपल, एच्पी, आयबीएम, जस्टसिस्टिम, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सॅप, सन, सायबेस, युनिसेस आणि इतर अनेक ह्यांसारख्या उद्योगक्षेत्रातील अग्रणींनी युनिकोड हे प्रमाणक स्वीकारलेले आहे. एक्सएमएल, जावा, ईसीएमएस्क्रिप्ट (जावा स्क्रिप्ट), एलडीएपी, कोब्रा ३.०, डब्ल्यूएमएल इ. आधुनिक प्रमाणकांत युनिकोड आवश्यक ठरते आणि आई.एस.ओ./आई.ई.सी. १०६४६ वापरण्यासाठीचा तो अधिकृत मार्ग आहे. अनेक आधुनिक कार्यकारी प्रणाल्यांत (ऑपरेटिंग सिस्टिमांत), सर्व आधुनिक न्याहाळकांत (ब्राव्जरांत) आणि इतर उत्पादनांत युनिकोड वापरण्याची सोय असते. युनिकोड प्रमाणकाचा आणि ते  वापरण्याजोग्या साधनांचा उदय ही वैश्विक सॉफ्टवेयर तंत्रज्ञानातील अलीकडच्या महत्त्वाच्या घटनांतील एक घटना आहे. 

क्लायण्ट-सर्व्हर, किंवा बहुस्तरील उपयोजने (अॅप्लिकेशन्स) आणि संकेतस्थळांवर युनिकोडाचा वापर केला असता पारंपरिक चिन्ह-संचांचा वापर करण्यासाठीच्या खर्चात लक्षणीय बचत करता येते.  एखादी आज्ञावली वा संकेतस्थळ विविध आधारप्रणाल्यांत, भाषांत आणि देशांत फेररचना न करता वापरणे हे युनिकोडामुळे शक्य होते. युनिकोडामुळे माहितीसाठा भ्रष्ट न होता विविध प्रणाल्यांत वापरता येतो.

युनिकोड कन्सॉर्शियमविषयी

युनिकोड कन्सॉर्शियम ही एक ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. हिची स्थापना युनिकोड प्रमाणकाचा विकास, विस्तार आणि प्रसार ह्यांसाठी झाली आहे. युनिकोड प्रमाणक हे आधुनिक संगणकप्रणाल्या आाणि प्रमाणके ह्यांत चिन्हांच्या मांडणीचे स्वरूप निश्चित करते. कन्सॉर्शियमचे सभासदत्व हे संगणक आणि माहिती-प्रक्रियेच्या उद्योगातील महामंडळे आणि संस्था ह्यांचा व्यापक पट दर्शवते. कन्सॉर्शियमचे उत्पन्न हे केवळ सभासदांच्या सदस्यशुल्कावर आधारलेले आहे. जे युनिकोड-प्रमाणकाचा पुरस्कार करतात आणि ज्यांना त्याचा विस्तार आणि उपयोजन ह्यांत रस आहे अशा जगातील कुठल्याही संस्था आणि व्यक्ती ह्यांच्याकरता युनिकोड कन्सॉर्शियमचे सदस्यत्व खुले आहे. कन्सॉर्शियमच्या महत्त्वाच्या कार्याला साहाय्य करण्यासाठी देणगी देऊन सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी पाहा, शब्दावली, तांत्रिक परिचय आणि उपयुक्त साधने.